- महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान Maharashtra Shri Anna Abhiyaan ठळक माहिती –
- प्रस्तावना –
- अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम व उपाययोजना –
- १. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत –
- २. आत्मा योजनेअंतर्गत –
- ३. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत –
- ४. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत (PMFME) व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत –
- ५. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART) –
- शासन निर्णय – GR – महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान PDF – येथे पहा
महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान Maharashtra Shri Anna Abhiyaan ठळक माहिती –
अभियानाचे नाव – महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान
अभियानचा कालावधी – १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४
अभियानचा हेतू – श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी
अभियानासाठी तरतूद केलेला निधी – २०० कोटी
प्रस्तावना –
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे “अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. याधर्तीवर महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान” सुरु केले आहे. त्यासाठी २०० कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अंतर्भाव आहे. सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्र” स्थापन करण्यात येईल. अशी घोषणा केलेली आहे.
अंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचप्रमाणे राज्यामध्ये साजरे होत असलेल्या अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने राज्यामध्ये दिनांक ०१ एप्रिल ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत या अभियानच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे उपक्रम / उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम व उपाययोजना –
पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व जनमानसापर्यंत पोहोचावे व या तृणधान्यांचा आहारातील वापर वाढावा यासाठी राज्यस्तरीय कृषि परिषदा, जिल्हा स्तरीय कृषि महोत्सव, मिलेट दौड (रन/वॉक फॉर मिलेट), पाक कला कृती स्पर्धा, आहारतज्ञांची व्याख्याने याद्वारे महाराष्ट्र श्री अन्न अभियानाची आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
१. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत –
प्रचार प्रसिद्धी, पिक प्रात्यक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणित बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषि औजारांचे वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्यांचे याज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी हे उपक्रम राबविण्याकरीता रुपये ११० कोटी इतका निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्याचे ठरले आहे.
२. आत्मा योजनेअंतर्गत –
तृणधान्यांचे बियाणे मिनीकिट वाटप करणे, पिक प्रात्यक्षिके, शेतकरी आभ्यास दौरे यांचे आयोजन करणे, माहिती पत्रके, भित्ती पत्रके, प्रसिद्धी पत्रके, इत्यादी माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करणे, शाळा, महाविद्यालये विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, बचतगट, हॉटेल संघटना इत्यादींच्या माध्यमातून पाक कला/कृती स्पर्धा, निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा इत्यादींचे आयोजन, समाज माध्यमे व प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे ठरले आहे. पौष्टिक तृणधान्यांचे याज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी उपक्रम राबविण्याकरीता रुपये ५ कोटी चा निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्याचे ठरले आहे.
३. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत –
समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यांमध्ये ज्वारी आणि बाजरी ही पौष्टीक तृणधान्य घेतली जातात अशा जिल्ह्यांमध्ये या पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढवणे व उत्पादन खर्च कमी करणे, मूल्यसाखळी बळकट करण्यास सहाय्य करणे, हवामानातील बदल आणि पावसाचा लहरीपणा या गोष्टींचा शेतीवर होत असलेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, ग्राम कृषी संजीवनी सदस्यांसाठी विशेष कार्यशाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतीशाळा, पौष्टिक तृणधान्य उत्पादकांसाठी लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन इत्यादी विषयांवर प्रशिक्षण/कार्यशाळा/अभ्यासदौरे, तालुका निहाय कृषी हवामान सल्ला सेवा, हवामान अनुकूल वाणांच्या बियाण्याचे उत्पादन, उत्पादीत मालाच्या मुल्यवृद्धीसाठी शेतकरी उत्पादक/महिला गटांना अर्थसहाय्य, उत्पादीत मालाची साठवणूक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी गोदाम उभारणीसाठी अर्थसहाय्य इत्यादीसाठी रुपये ५ कोटी निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्याचे ठरले आहे.
४. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत (PMFME) व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत –
तसेच एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदुरबार या जिल्ह्यांकारीता पौष्टीक तृणधान्य आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश, लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुविधा इत्यादीसाठी रुपये ५० कोटी निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्याचे ठरले आहे,
५. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART) –
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पौष्टीक तृणधान्य प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल. तृणधान्यांच्या मूल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमाचे आयोजन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी, ब्रॅन्डींग, मार्केटींगच्या सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैद्राबाद या संस्थेसोबत सामंजस्य करार करुन सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी “श्री अन्न (Millets) उत्कृष्टता केंद्र” स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी रुपये ३० कोटी निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्याचे ठरले आहे.
६. त्याचप्रमाणे राज्यातील कृषीविद्यापिठांमार्फत शेतकरी शास्त्रज्ञ मंचातील सदस्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन, ज्वारी, बाजरी व नाचणी लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे आयोजन, तृणधान्य उत्पादकांची पीक स्पर्धा आयोजन, तृणधान्य पीक लागवड – आकाशवाणी व वृत्तपत्र द्वारे प्रचार प्रसिद्धी करणे, आकाशवाणी मार्फत सधनलागवड माहिती, बाजरी संशोधन योजना – पीक प्रात्यक्षिक, नियोजन व निविष्ठा वाटप, शेती-भाती मासिकातून तृणधान्य विषयक लेख व यशोगाथा प्रसिद्धी, प्रसिद्धी माध्यमांमार्फत व्याख्यान व मुलाखतीद्वारे प्रसिद्धी, महिलांसाठी पौष्टीकतृणधान्याचे आहारातील महत्व (प्रशिक्षण व आरोग्य तपासणी कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामीण व शहरी स्तरावर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांसाठी आहारतज्ञ व योगतज्ञ यांचे तृणधान्याच्या महत्वाबाबत मार्गदर्शन व प्रभात फेऱ्यांचेआयोजन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.